‘सामना’वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या; आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा ‘जनरल डायर’ हे उद्धव ठाकरे – चित्रा वाघ

जालना येथील आंतरवाली गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमारावरून राजकारण तापले आहे. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले असून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जनरल डायर’ म्हटले आहे. तर, भाजपाने या टीकेवर पलटवार केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ह्या ‘सामना’वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या,या शब्दांत वाघांनी हल्लाबोल चढविला. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल,असे त्या म्हणाल्या. पण,देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा ‘जनरल डायर’ हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते,असा घणाघात त्यांनी केला.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाकर्त्या धोरणाची परिणती सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण धारातीर्थी पडण्यात झाली. आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर आहात, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये सध्या जनरल डायरचं राज्य सुरू आहे. राज्यात सध्या एक नाही तर तीन जनरल डायर आहे. यामध्ये एक मुख्य आणि दोन उप जनरल डायर आहे. राज्यामध्ये सध्या जनरल डायरच्या मानसिकतेनं राज्य कारभार सुरू आहे. जे विरोधात जातील, त्यांच्यावर लाठी चार्ज आणि हल्ला घडवला जाईल.”