जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली आहे. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.
मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांचा सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, यासंदर्भातल्या समितीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचंही आश्वासन सरकारच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना सुनावलं आहे. काहीजण राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत. पण माझं मराठा समाजाला आवाहन आहे की, बांधवांनो कृपया शांतता राखा. मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. सरकार यासाठी योग्य ती पावलं उचलेल, असं अजित पवार म्हणालेत.
“आम्ही तिघांपैकी कुणी तसे आदेश दिले असतील तर राजकारणातून बाजूला होईन. पण तसं सिद्ध नाही झालं, तर त्यांनी राजकारणातून बाजूला व्हावं. आहे का हिंमत? काहीजण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण खुशाल सांगतात की वरून आदेश आल्यानंतर हे घडलं. मी सांगतो, वरून आदेश आले असं सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणाल ते करू. पण उगीच शंका, गैरसमज निर्माण करायचे, समाजात अस्वस्थता निर्माण करायची आणि त्यातून काही साध्य करता येतं का असा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. तो महाराष्ट्राला परवडणारा नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत आहे याची जाणीव सगळ्यांनी ठेवायला हवी”, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. याचपार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला गैरहजर होतो. पण याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवला गेला.
