जालनामधील अंबड येथे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत पोलीसही मोठ्यासंख्येने जखमी झालेले आहेत. त्यात आता या घटनेला राजकीय वळण दिलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“मराठा आरक्षणप्रकरणी शरद पवार यांची भूमिका दुटप्पी होती हे कळून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. या आत्मचरित्रात मराठा समाजाचा विकास का होत नाही हे त्यांनी लिहिलं आहे. मराठा समाजामध्ये ३०-४० वर्षांपासून असंतोष वाढतोय, असं त्यांनी आत्मचरित्रात लिहिलं. मग या ३०-४० वर्षांत त्यांनी काहीच का केलं नाही, मराठा आरक्षण मिळण्यास थेट अडचणी होत्या. थेट अडचणी असतील तर मार्ग का काढले नाहीत”, असा सवाल भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट तसेच ट्वीट करत यांनी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ यांच्या आत्मचरित्राचा दाखल देत बारकाईने अभ्यास केल्यास शरद पवार यांची दुटप्पी भूमिका लक्षात येईल, असे म्हटले आहे. मराठा तरुणांमध्ये असंतोष वाढत गेल्याचे मुद्दे शरद पवार यांनी पुस्तकात मांडले आहेत. त्या काळात ते सत्तेवरही होते, असे म्हणत त्यांनी काही उपस्थित केले आहेत. त्यावेळी मराठा समाजाला शांत करण्यासाठी शरद पवार यांनी काय केले? आरक्षणाला थेट कायदेशीर अडचणी होत्या तर मराठा तरुणांच्या सक्षमीकरणासाठी पवार साहेबांनी काय प्रयत्न केले?
देवेंद्र फडणवीसांनी सारथी सुरु केली, ज्यातून १०० पेक्षा जास्त मराठा तरुण झाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सुरु केलं, ज्यामुळे मराठा तरुण छोटे-मोठे व्यवसाय करु लागले. देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून आरक्षण सुप्रिम कोर्टापर्यंत टिकवले, पण शरद पवार शिल्पकार असलेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे ते आरक्षण गेले. यावर पवारांना कधी कळवळा आला?” असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.
“आरक्षण देणे हे वादग्रस्त आहे, अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याच पुस्तकात आहे. जो समाज गरजू आहे, ज्या समाजाला आवश्यकता आहे त्यांना आरक्षण देणे गरेजं आहे. त्यात वादग्रस्त काय असू शकतं? याचाच अर्थ मराठाला समाजाला आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका शरद पवारांनी वेळोवेळी मांडली होती. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका आहे हे त्यांच्याच आत्मचरित्रातून स्पष्ट होत आहे”, असंही केशव उपाध्ये म्हणाले.
