शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये सभा झाल्यानंतर आता अजित पवार गटाची सभा आज होतेय. जितेंद्र आव्हाडांनी कोल्हापुरी पायताणावरुन हसन मुश्रीफांवर टीका केली होती. त्याला आज धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.”गद्दारी केलेल्या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायताणाचा वापर करावा लागेल” अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाडांनी सभेतच मुश्रीफांना लक्ष्य केलं होतं. त्यावर मुश्रीफांनी कापशीच्या चपलेचा उल्लेख करत ती करकर वाजते आणि एकदा बसली की त्यांना कळेल, असं प्रत्युत्तर दिलं होतं.
काळ कोल्हापूरातच आव्हाड यांना अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले. हसन मुश्रीफांनी तुम्हाला प्रेमाने जरी मिठी मारली, तर तुमच्या बरगड्या जागेवर राहतील का? असा जोरदार टोला मुंडे यांनी आव्हाड यांना लगावला. यावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. ज्या कोल्हापूरात आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, त्याची व्याजासकट धनंजय मुंडे यांनी परतफेड केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की शरद पवार साहेबांची सभा झाली आणि लोक आम्हाला विचारू लागले उत्तर देण्यासाठी तुमची सभा होणार का? आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार आहे. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरीक कधी सहन करणार नाहीत. ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात. बीड आणि कोल्हापूरचं आगळ वेगळं नात आहे. तुम्ही ऊस पिकवणारे आणि आम्ही ऊस तोडणारे आहोत, असे मुंडे म्हणाले.
