मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या 5 हजार 309 सदनिकांसाठी लॉटरी

मुंबई जवळ घर घेणा-यांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय,उद्यापासून अर्जविक्रीला सुरूवात होणार आहे. या लॉटरीची नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहे. मे महिन्यात म्हाडाने 4 हजार 654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, सोडतीतील अनेक घरं विकली नाहीत. तसंच प्रथम येणा-यांना प्राधान्य आणि म्हाडा योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिल्लक घरांसह म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनेतून उपलब्ध झालेल्या घरांसाठी सोडत आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्याची घोषणा केली आहे. आजपासून ( 15 सप्टेंबर) यासाठी अर्ज विक्री सुरू होणार आहे. याआधी म्हडाच्या कोकण मंडळाकडून 4 हजार 654 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. मात्र या सोडतीला लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यानं या सोडतीमधील अनेक घरांची विक्री झाली नव्हती. त्यामुळेच या योजनेतील शिल्लक घरांसह नवीन योजनेतील सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ॲपच्या सहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज 15 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम वर उपलब्ध आहे. ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.