गेल्या काही दिवसांपासून राज्यात कंत्राटी भरतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका होत आहे. या भरतीमध्ये आरक्षणही नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. आपल्याला यासंदर्भात विनाकारण ट्रोल केलं जात असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला गेला. विनाकारण मला ट्रोल करण्यात आलं. राज्यातील वेगवेगळ्या विभागात दीड लाख पदांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. मी आता सत्ताधारी पक्षात आहे. मात्र आमचे जे विरोधक आहेत, त्यांना उकळ्या फुटत आहेत. ते सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने बातम्या पसरवतात.दरम्यान मी आढावा घेत असताना आरोग्य विभाग-शिक्षण विभाग, रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी टाटा कंपनीसह तीन कंपन्या निवडल्या आहेत. शिवाय एमपीएससी देखील आहे. काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. मागच्या सरकारमध्ये शिक्षकभरतीत काय झालं सर्वांना ठावूक असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला.
मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, G-20 च्या निमित्तानं सर्व प्रमुख नेते दिल्लीत आले होते. तसंच, लोकसभेसाठी 5 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं आहे तसंच, कामाचं व्याप अधिक असल्यानं अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
मी काल आरोग्य विभागाचा आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी स्टाफ कमी आहे. तो स्टाफ भरण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अजित पवार म्हणाले. शिक्षण विभागातही भरती करणार आहोत. ज्या ठिकाणी शिक्षकांची गरज आहे, तया ठिकाणी निवृत्त झालेल्या शिक्षकांना आपण तात्पुरते घेतल्याचे अजित पवार म्हणाले. भरती तात्काळ करावी लागते नाहीतर काही जण लगेच कोर्टात जातात असे अजित पवार म्हणाले. सध्या विरोधक कारण नसताना आम्हाला बदनाम करण्याचं काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आपण वेगवेगळ्या विभागात 1 लाख 50 हजार मुला मुलींची भरती करणार आहोत. ही सघळ्यात मोठी भरती असणार आहे. आत्तापर्यंत एवढी मोठी भरती कोणत्याही सरकारच्या काळात झाली नव्हती असे अजित पवार म्हणाले.
