राज्याच्या काही भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज होता. पण ठिकठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पावसाचा जोर आजही वाढला नाही. त्यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज दिला.सध्या पावसानं उघडीप दिली आहे. मात्र, पुढील चार चे पाच दिवसात राज्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळं उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला.तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील तब्बल 453 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिकचा पावसाचा खंड आहे. तर 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या भागात पिकांची बिकट परीस्थिती आहे. आता बळीराजाला केवळ परतीच्या पावसाकडून अपेक्षा आहे. पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यात चांगला पाऊस नसल्याने अनेक प्रकल्प, धरण कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.
पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील एकूण 24 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. यामुळे आगामी चार दिवस पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे. मुंबई, पुणेसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
