कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आज, शनिवारपासून म्हणजे १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गसह इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक कार्यालायांमध्ये पथकर माफीचे (टोल) पास मिळणार आहेत. त्यासाठी वाहन चालक परवाना, नोंदणी पुस्तक, छायांकित प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावी लागणार आहे. जे गणेशभक्त मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात जाणार आहेत. त्यांना या पासचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी सर्व विभागीय वाहतूक कार्यालयामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत तसेच नियंत्रण कक्षात चोवीस तास पासेस मिळणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांना ९५२९६८१०७८ या वाहतूक शाखेच्या मुख्य नियंत्रण कक्षाला संपर्क साधून मदत घेता येणार आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.