मुंबईत 9 लाखात स्वतःचे घर घेण्याची सुवर्णसंधी; 26 ऑक्टोबर ला सोडत

मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. विशेषत: जे लोक छोट्या शहरांतून कामानिमित्त येतात आणि कसे तरी मुंबईत राहण्याची व्यवस्था करतात, त्यांच्यासाठी मुंबईत स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे तेही आता मुंबईत घर खरेदी करू शकणार आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ने यावर्षी दुसऱ्यांदा 5,311 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी उघडण्याची घोषणा केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर आणि रायगडसह मुंबईजवळ लॉटरीद्वारे 5,311 परवडणाऱ्या घरांची विक्री जाहीर केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून सुमारे पावणे पाच हजार घरांकरिता 26 ऑक्टोबर ला सोडत काढण्यात येणार असून नागरिकांना परवडतील अशा दरांमध्ये घरे मिळण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. विशेष म्हणजे या सोडतीत सर्वसमावेशक योजनेतील 20% घरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 10 मे ला म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत पार पडली होती.परंतु यामध्ये काही घरे विक्री झालेली नाहीत म्हणून हे विक्री न झालेल्या घरांचा देखील या सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे व त्यासोबतच विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध घरे देखील समाविष्ट करण्यात येणार आहेत. या सोडतीसाठीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे व याच दिवसापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

या ठिकाणी जर विचार केला तर साधारणपणे नऊ लाख 89 हजार ते 42 लाख रुपये किमतीचे घरे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 20% योजनेतील 417 घरे हे पनवेल मधील गोदरेज प्रकल्पात असून त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे डोंबिवली येथील रुणवाल प्रकल्पातील 621 घरांना या सोडतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.सर्वात लहान अपार्टमेंट 258 स्क्वेअर फूट असेल आणि सर्वात मोठ्या अपार्टमेंटचा आकार 667 स्क्वेअर फूट असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in/ ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.

शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून या घरांच्या किंमती 14 लाखांपासून 21 लाखांवर आहेत. रायगडमधील खानावळे, तळेगाव आणि कल्याणमधील घरीवली येथे अत्यल्प गटासाठी 12 ते 13 लाखापर्यंत घरांच्या किंमती आहेत. ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यात अल्प गटासाठी घरे असून त्यांची किंमत 12 ते 32 लाखांपर्यंत आहेत.