जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड जून 2022 मध्येच भाजपसोबत जाणार होते; प्रफुल्ल पटेलांचा खळबळजनक दावा

शनिवारी खरा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. त्याआधीच आज अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघेही सर्व आमदारांसह जून 2022 मध्येच भाजपसोबत जाणार होते, असं पटेल म्हणालेत. त्यांच्या या दाव्याने राष्ट्रवादीचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर सुरत गाठून गुवाहाटीला जाण्याचं ठरवलं त्याचवेळी ही घटना घडणार होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक त्यावेळी तुरुंगात होते. त्यामुळे त्यांना वगळता राष्ट्रवादीच्या इतर 51 आमदारांसह जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना पत्र दिलं होतं, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत.

यानंतर पटेलांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना राष्ट्रवादीबाबत काय घडामोडी घडल्या याचाही खुलासा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसाठी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिवसेनेकडे 56 तर राष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली होती. दुसरा प्रस्ताव उद्धव ठाकरेंकडे ठेवला होता. त्यानुसार तीन वर्षे शिवसेना आणि दोन वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिल असे त्या प्रस्तावात म्हटले होते.

प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यांच्या या वक्तव्यांची आता राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पटेल पुढे म्हणाले, चार पाच लोकांना अडचण होती म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांकडे ठेवला असे म्हणण्यात काही तथ्य नाही. इतकेच नाही तर आज जे लोक शरद पवारांबरोबर आहेत ते देखील भाजपबरोबर जाण्याच्या मानसिकतेत होते.