मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. यात आतापर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असंही जाहीर केलं. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 46 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर ३० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संपुर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. महापालिका आयुक्त आणि पोलिस आधिकारी यांच्या संपर्कात आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. केद्रींय गृहमंत्री अमित शाह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, माझी तेथील पोलिस, आधिकारी यांच्याशी चर्चा सुरू आहे. मी माहिती घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कागद आणि कापडामुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, असंही मुख्यमंत्री पुढे म्हणालेत.
जखमी झालेल्यांवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल ट्रामा केअर रुग्णालयात दाखल झाले आहे. तर दीपक केसरकर म्हणाले, दिल्लीहून मुख्यमंत्र्यांच दिल्लीहून फोन आला आणि त्यांनी मला तात्काळ गोरेगावला जायला सांगितलं आहे. तर पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संपर्कात मी आहे. गोरेगाव येथे घडलेली दुर्घटना दुर्दैवी आहे. आग इमारतीच्या खाली कापडाच्या आणि भंगारच्या गोदामामध्ये लागली.
