महाराष्ट्र विधीमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यानिमित्त सर्वच आमदार नागपूर येथील विधीमंडळात पोहोचले आहेत. विधानपरिषधेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधीमंडळात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू उद्धव ठाकरे यांनी कधीच ऐकून घेतली नाही, असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला.
पुढे बोलताना नीलम गोऱ्हे बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेमध्ये आताची फूटच पडली नसती. नाराजांना त्यांनी थांबविले असते. वेळप्रसंगी स्वत: कार काढून समजूत काढून परत आणले असते. अर्थात बाळासाहेबांनी नेमके काय केले असते हे निश्चित सांगता येत नाही. पण, अशा प्रसंगांतून त्यांनी खात्रीशीरपणे मार्ग काढला असता, अशी भावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
राजकीय इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणे शक्य आहे. निवडणुकांतील महिला आरक्षण विधेयकाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे करून दाखविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अशी इच्छाशक्ती आहे. हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. २०१४पासून प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्या भूमिका सतत बदलत राहिल्या आहेत. सध्या राज्यात जे काही चालले आहे ते पचविणे अवघड आहे. त्यामुळे, मी सध्या फार दूरचा विचार करत नाही. पुढील केवळ तीन महिन्यांचा काळ माझ्या डोळ्यांसमोर ठेवला आहे, असेही त्या म्हणाल्या.
“एकनाथ शिंदे यांची साथ देण्याआधी मी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअप करून माझी भूमिका कळवली होती. त्यानंतर एकदा त्यांनी मला फोन करून सांगतिले की, विधानपरिषदेत आता माझी एकच खूर्ची राहिलीये आणि ती तुमच्या दालनात आहे. मी त्यांना म्हटले की, ती खूर्ची तुमच्यासाठी कायम राहणार. एकनाथ शिंदेंनाही मी सांगितले होते की, मी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका करणार नाही”, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वीएक वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडली होती. मी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर माझे त्यांच्याबरोबर काहीही मनभेद नाहीत. पण त्यांच्याबाजूने काय आहे, याची मला कल्पना नाही, असेही त्या म्हणाल्या.
