हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिंपिक स्पर्धेत स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक (कास्य पदक) जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी याकरिता त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच, 15 जानेवारी दरवर्षी ‘राज्याचा क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. या प्रस्तावास शासनानं मान्यता दिली आहे. तसेच, क्रीडा सप्ताह आणि राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा 2 लाख 25 हजार रुपये देण्याचा शासनानं निर्णय घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी माहिती दिली आहे.
मंत्री संजय बनसोडे म्हणाले, भारताला पहिले वैयक्क्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव वाढवणाऱ्या व त्यांच्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा, त्यातून राज्यातील विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी, याकरिता त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी राज्याचा ‘क्रीडा दिन’ म्हणून प्रतिवर्षी सर्वंत्र साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्हयास पुर्वी १० हजार अनुदान देण्यात येत होते. त्यात वाढ करुन प्रत्येक जिल्ह्यास राज्याच्या क्रीडा दिनासाठी ७५ हजार, राष्ट्रीय क्रीडा दिनास ५० हजार तर क्रिडा सप्ताहास १ लाख रुपये असे एकुण २ लाख २५ हजार सुधारीत अनुदान देण्याचा शासन निर्णय (ता.२९) काढण्यात आला आहे. ही क्रीडा प्रेमींसांठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मंत्री बनसेडे यांनी सांगितले.
क्रीडा आणि युवक सेवा संचनालय, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकुले, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालये, शासकीय तसेच खासगी विद्यापीठे, क्रीडा संस्था, मंडळे अकादमी, क्रीडा योजनांचा लाभ घेणाऱ्या संस्थांमध्ये साजरा केला जाणार आहे. यावेळी खाशाबा जाधव यांच्या योगदानावर व्याख्यान, क्रीडा रॅली, मरेथॉन, मार्गदर्शन शिबिर, खेळाडूंशी संवाद, क्रीडा पुरस्काराचे वितरण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, क्रीडा उपक्रमांचे आयोजन यामध्ये करण्यात येणार आहे. त्यास क्रीडा प्रेमींनी उत्फुर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन क्रीडा मंत्री बनसोडे यांनी केलं आहे.
