नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच इंधनाच्या दरांबरोबरच गॅस सिलेंडरचे दरही कमी झाले आहेत. 19 किलोग्राम वजनाच्या कमर्शिअल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. एका अर्थाने उद्योग, व्यापारामध्ये असलेल्या सिडेंलर वापरकर्त्यांना नवीन वर्षाचं अनोख सप्राइज देताना पहिल्याच दिवशी कंपन्यांनी प्रति सिलेंडर 1.50 रुपये दरकपात केली आहे. नवीन किंमत ही आज सकाळपासून म्हणजेच पहाटे 6 वाजल्यापासून लागू झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने गृहिणींना या निर्णयाचा फारसा फायदा होणार नाही हे स्पष्ट आहे.
गेल्या महिन्यातही केंद्राने व्यावसायिक सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी केली होती. त्यामुळं व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. आता 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने सिलिंडरच्या दरात मोठी कपात अपेक्षित होती. कारण 2019 मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुतीएलपीजी ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली होती. मात्र, आज व्यावसायिक सिलिंडरचे दर फक्त अवघ्या काहीच रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात केल्यानंतर आज दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. याआधी हा दर 1,757 रुपये होता, त्यामुळे दिल्लीत दर दीड रुपयांनी कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये एलपीजीच्या किंमतीत सर्वाधिक 4.50 रुपयांची कपात करण्यात आली असून 19 किलोचा सिलेंडर आता 1,924.50 रुपयांना मिळेल. मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 50 पैशांनी वाढली असून आज दर 1,869 रुपये आहे.
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी हवाई इंधनाच्या दरांमध्ये कपात केली आहे. या इंधनाचे दर 4162.50 रुपये प्रति किलो लीटरपर्यंत कमी करण्यात आले आहेत. सलग तिसऱ्यांदा हवाई इंधनाचे दर कमी करण्यात आल्याने प्रवाशांना याचा फायदा पोहचवण्याच्या दृष्टीने विमानप्रवासाच्या तिकीटांचे दर कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आजपासून इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.
