सोम्यागोम्याला मी उत्तर देत नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संजय राऊतांना एका वाक्यात उत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखाद्याने टीका केली तरी त्याला हटके शैलीत अजित पवार उत्तर देतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजितराव हवा बहुत जोर से बेह रही है… टोपी उड जायेगी!, अशी टीका संजय राऊत यांनी पुण्यामध्ये बोलताना केली होती. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलंय. अजित पवार भीमा कोरेगावमध्ये बोलत होते.

“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल. काही गोष्टी चुकल्या तर त्यात काही दुरुस्ती करता येतील. काही नसताना बदनामी करण्याचे काम अलीकडे सुरू आहे. ते थांबले पाहिजे. ते आपल्या हिताचे नाही. जनता जनार्दन सर्व आहे. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आहे. .आज देशाच्या समोर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही. आपल्या देशाची शान वाढतेय. 80 कोटी जनतेला अन्न धान्य वाटप होते. जनता उपाशी पोटी झोपू नये हाच उद्देश आहे. निधी वाटपात काही गैरसमज झाला असेल,” असेही अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील अनेक उद्योग राज्याबाहेर जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. आता सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पही गुजरातला जात असल्याचे वृत्त आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली. यावरही अजित पवरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल याबाबत माहिती देऊन पाणबुडी प्रकल्प गुजरातला जात नाही, हे सांसिगितलं. राज्यातून काहीही उद्योग बाहेर गेले नाहीत. प्रकल्प बाहेरच्य राज्यात जातीलच कसे, प्रकल्प बाहेर जात असतील तर आम्ही गप्प तरी कसू राहू. आता निवडणूकीच्या तोंडावर विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाही. त्यामुळं हे मुद्दे काढले जात आहे. विरोधकांकडून तरुणाईच्या मनात रोष कसा निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहेत. कालच मी मुख्यमंत्र्याचं निवेदन ऐकलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही, असं अजित पवार म्हणाले.

डीपीडीसीच्या निधी वाटपावरून भाजपच्या डीपीडीसी सदस्यांनी लेखी नाराजी व्यक्त केली होती. तसं पत्र विभागीय आयुक्तांना दिलं होतं त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात डीपीडीसीच्या निधी वाटपाचं सूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठरवलं आहे . त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यात देखील निधीचं वाटप करण्यात आलं आहे. त्याविषयी कोणाचं काही म्हणणे असेल तर मला माहिती नाही, असं अजित पवार म्हणालेत.