2024 या नववर्षाची आजपासून सुरुवात होतेय. या नववर्षाची सुरुवात प्रत्येक जण आपआपल्या परीने आणि आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे करतो. अनेक भाविकांनी मंदिरात जात देवदर्शन करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये जात देवाचं दर्शन घेत नववर्षाची सुरूवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासून भाविकांच्या रांगा पाहायला मिळतायेत. वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करत नवीन संकल्प करण्यासाठी अनेक ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने सिद्धिविनायक मंदिरात पोहोचत आहेत. भाविक प्रभादेवी आणि दादर स्टेशनवरून मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सहज दर्शन घेता यावं यासाठी तशी सोय करून देण्यात आलीय.
सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभर ख्याती असलेल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भाविक वर्षात स्वागत करण्यासाठी साई दरबारात हजेरी लावतात. कालही साईभक्तांनी श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होते. त्यामुळं शिर्डी हाऊफुल्ल झाली आहे. संभाव्य गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील योग्य नियोजन करण्यात आले आहे. देशभरातून आलेल्या साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर उघडं ठेवण्यात आलं होतं.
शिर्डीत साईबाबा संस्थानने 110 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नविन दर्शन काॉम्लेक्समुळे भाविकांना गर्दीतही आल्हाददायक दर्शन मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले होते. या दर्शनरांगेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. दर्शनासाठी अलोट गर्दी असताना देखील भाविकांना सुलभ दर्शन मिळत आहे.
शिर्डी प्रमाणेच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तांची मोठी गर्दी केली. नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करण्यासाठी हजारो भाविक मंदिर परिसरात आले आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सुंदर फुलांची आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसर भक्तांनी गजबजला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पाचशे वर्षानंतर जगातल्या सर्वात देखण्या मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र 22 जानेवारी 2024 रोजी प्रवेश करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचसाठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी न्यासाचे आचार्य किशोरजी व्यास हे विठुरायाला निमंत्रणाच्या अक्षता देण्यासाठी येत आहे. सकाळी ते विठ्ठल मंदिरात जाऊन देवाच्या पायावर राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि अक्षता ठेवतील. तसेच रामरायाला विठुरायाकडून ज्ञानेश्वर माऊलींचे चांदीचे पसायदान भेट म्हणून देण्यात येणार आहे.
