राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या १० जानेवारी रोजी लागणार आहेत. यावेळी होणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाबाबत नेमके काय होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, सरकार पडणार असल्याची विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत वारंवार करतात. त्यांच्या या वक्तव्यांचा शिंदे गटाचे नेते, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी खिल्ली उडवली आहे.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सरकार पडणार असं सांगत अनेक तारखा दिल्या. हे दोघेही सकाळी उठले की त्यांना एकनाथ शिंदे आणि सरकार दिसतं. कितीतरी वेळा सरकार पडेल अशा तारखा दिल्या. त्यांना रात्री झोपीतही सरकार पडण्याची स्वप्न पडतात आणि ते सकाळी तुमच्यासमोर बोलत असतात. असा टोलाही संदीपान भुमरे यांनी लगावला.संदीपान भुमरेंनी सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागेल, असाही विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पात्र-अपात्रेच्या निकालाबाबत आम्ही बिनधास्त आहोत. दहा तारखेच्या निकालाची आम्हाला धाकधूक वाटत नाही. समोरच्यांचीच धडधड वाढली आहे. आम्ही जे काही केले ते कायदेशीर बाजू तपासून केले आहे. आम्हाला न्याय देवतेवर विश्वास आहे. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने लागेल.
मराठ्यांना आरक्षण देण्याचीच आमच्या सरकारची भूमिका आहे. आठ दिवसांनी बैठका होत आहेत. शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोग चांगलं काम करतो आहे. राज्यात आत्तापर्यंत ५४ हजार पुरावे सापडले आहेत. इतरही काम सुरु आहे. ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं हीच आमची भूमिका आहे असंही संदीपान भुमरेंनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यासाठी एकनाथ शिंदे यांनी जसं म्हटलं आहे की तसं अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात बोलवलं जाईल असंही भुमरे यांनी स्पष्ट केलं.
