अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी ही माहिती दिली. मूर्ती तयार करण्यासाठी तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली होती. अरुण योगीराज या तीन शिल्पकारांत होते. यानंतर अरुण योगीराज यांनीही प्रतिक्रिया दिली. मला खूप आनंद होत आहे की ज्या तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली त्यात माझं नाव होतं. अरुण योगीराज नेमके कोण आहेत याबद्दल थोडक्यात माहिती.
रामाची मूर्ती घडवणारे 37 वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. इतकंच नाही तर अरुण योगीराज यांचे वडील वाडियार घराण्याच्या राजवाड्यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामासाठीही ओळखले जातात. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.
अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंच पुतळा बनवला होता, जो इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे बसवण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला तेव्हा त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांचेही कौतुक केले होते. एवढेच नाही तर अरुण योगीराज यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट देखील घेतली आहे. याशिवाय अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्ती बनवली होती, त्यानंतर अरुण योगीराज हे चर्चेत आले होते.
प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातून तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली. अरुण योगीराज हे या शिल्पकारांपैकी एक होते. अरुण यांची निवड झाल्यापासूनच त्यांचे कुटुंबीय अत्यंत खूश होते. अखेर आज प्रभू श्रीरामाची मूर्ती पूर्ण झाली असून येत्या 22 तारखेला अयोध्येतील भव्य राम मंदिरात अरुण यांनी घडवलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान होणार आहे.
