लोकसभेसाठी महायुतीची ‘महारणनिती’, 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे; संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती

14 जानेवारीपासून राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात 45 हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महायुती म्हणून येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला आहे. गेली 10 वर्षे नरेंद्र मोदी हे देशासह जगभरात देशाची प्रतिमा उंचावत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो आहोत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमचं महायुतीचं सरकार काम करतंय. अशातच निवडणुका लक्षात घेता जानेवारी महिन्यापासूनच जिल्ह्याजिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. 14 जानेवारीला एकाच दिवशी सगळ्या जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे घेतले जाणार आहेत. किमान एक हजार कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होण्याची शक्यता आहे. पण लोकांचा उत्साह पाहता जास्त लोक इथं येऊ शकतात, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

पक्षप्रवेशावर बोलतान बावनकुळे म्हणाले, पक्षप्रवेशासाठी लोकांचा ओढा लागला आहे. येत्या काळात महाविकास आघाडीकडे केवळ नेते शिल्लक असतील, कार्यकर्ता कुणीच नसेल. जेव्हा मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे 45 खासदार उभे असतील. विधान सभेत देखील 225 प्लस महायुती क्रॉस करेल.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला यश मिळेल.

शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनीही आपली भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात अनेक चांगले निर्णय घेतले गेले. तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. ही कामं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जिल्हा पातळीवर मेळावे घेत आहोत. आगामी निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं दादा भुसे म्हणाले.