कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्यास पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजतं. परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय.येणाऱ्या सणांच्या काळात पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही टास्क फोर्सनं सांगितलंय. दरम्यान राज्यात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 863 वर पोहोचली आहे.
कोरोनाची रुग्ण संख्या देशभरात वाढत आहे. जेए.1 रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थांना सतर्क करण्यात आले असून तयार राहण्यास सांगण्यात आलं आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांनाही काही दिवस गृहविलगीकरणात राहण्यास सांगण्यात येण्याची शक्यता आहे. विषाणूचा प्रचार होऊ नये यासाठी टास्क फोर्सकडून काळजी घेतली जात आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 138 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 75 रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळं राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाणं हे 98.17 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 862 वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण ठाण्यात आहेत.ठाण्यात कोरोनाचे 237 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये 138 आणि पुण्यात 136 सक्रीय रुग्ण आहेत.
