राज्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बिगरमोसमी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे उसाची उत्पादकता व साखर उताऱ्यामध्ये दहा ते बारा टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. हंगामपूर्व अंदाज ८८ लाख टनांचा होता, आता ९५ लाख टनांवर साखर उत्पादन जाण्याचा अंदाज आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. पूर्वीच्या अंदाजानुसार ८८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता होती. आधीच्या अंदाजानुसार सरासरी गाळप दिवस ९० ते १०० अपेक्षित होते. ते आता १२५ ते १३० पर्यंत गृहीत धरले आहेत. आधी एकूण ९४६ लाख टन ऊस उपलब्धता गृहीत होती. आता त्यात पाच टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे.
९९३ लाख टनांपैकी डिसेंबरअखेर ४२८ लाख टन गाळप झाले. त्यातून ३८.२० लाख टन साखर ६० दिवसांत तयार झाली. अद्याप ५६५ लाख टन गाळप बाकी आहे. उर्वरित ६० टक्के गाळपातून ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज खरा ठरू शकतो, असे ठोंबरे म्हणाले. केंद्राने आधी सिरपपासून इथेनॉलनिर्मितीवर घातलेली बंदी व त्यामुळे इथेनॉलकडे वळवलेल्या साखरेच्या वापरात झालेली घट यामुळेदेखील उत्पादन वाढेल.
बिगरमोसमी पावसामुळे प्रतिहेक्टरी उसाच्या उत्पादनात आठ ते दहा टक्के वाढ झाल्याने एकूण उपलब्ध उसामध्ये पाच टक्के वाढ झाल्याने एकूण गाळपाचे दिवस १०० वरून १२५ ते १३० दिवस अपेक्षित आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेर फक्त ४० टक्के ऊस गाळपातून ३८ लाख टन साखर उत्पादन झाले असल्याने उर्वरित ६० टक्के ऊस गाळपातून एकूण ९५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
देशात गळीत हंगामाने गती घेतली आहे. मात्र, गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन अद्याप कमीच आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रिज लिमिटेडच्या आकडेवारीनुसार, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील ५११ साखर कारखान्यांमध्ये हंगाम २०२३-२४ साठी गाळप सुरू झाले आहे आणि आतापर्यंत १२२२.६४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून आतापर्यंत ११२.१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात समान कालावधीपर्यंत ५१४ साखर कारखान्यांनी १३२०.५५ लाख टन उसाचे गाळप करून १२१.३५ लाख टन साखर उत्पादित केली होती.
