मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण

अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलं गेलेलं नाही. यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर विरोधी नेते टीका करत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

जळगावचे मूळ रहिवासी आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचाही समावेश आहे. अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं ॲड.उज्ज्वल निकम यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात 534 विशेष निमंत्रित केलं गेलं आहे. उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळा पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.