बळीराजाची चिंता वाढली; पुण्यासह 8 जिल्ह्यांत आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. तर ढगाळ आकाशामुळे थंडी ओसरली आहे. आज उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुण्यासह राज्यातील आठ जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीये. अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी संकट कोसळल्याचं समोर आलंय. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो.

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. अनेक भागातील थंडीचा प्रभाव कमी झाला असून ढगाळ वातावरण झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुढील 2-3 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात कडाक्याची थंडी तसेच काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडी नुसार, 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो.