आसाम सरकारने 22 जानेवारी हा दिवस राज्यात ड्राय डे म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या दिवशी अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रविवारी (7 जानेवारी) रोजी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर राज्याचे पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी ही माहिती दिली. त्याचवेळी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही राज्यात 22 जानेवारी हा ड्राय डे असेल, अशी घोषणा केली आहे.
पर्यटन मंत्री जयंत मल्ल बरुआ यांनी रविवारी (7 जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर उद्घाटनानिमित्त राज्यात कोरडा दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि 6 हजारहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
सरकार एखादा विशेष सण किंवा विशेष प्रसंगी संपूर्ण राज्यात दारुविक्रीवर बंदी घालतं, तेव्हा त्या दिवसाला ड्राय डे असं म्हणतात. ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असते. महत्त्वाचं म्हणजे, हा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई केली जाते. 1962 मध्ये पंजाबच्या उत्पादन शुल्क कायद्यात पहिल्यांदा ड्राय डेचा उल्लेख करण्यात आला होता. नंतर केंद्र सरकारनं 1950 मध्ये संपूर्ण भारतात लागू केला.
दुसरीकडे महाराष्ट्राचे भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन मागण्या केल्या आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी तब्बल 450 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. अशा परिस्थितीत हा पवित्र दिवस आहे. त्यामुळे कोट्यवधी रामभक्तांची श्रद्धा आणि भावना लक्षात घेता 22 जानेवारीला राज्यात दारू आणि मांसविक्रीवर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुजरातमधील सुरत शहरात कापड व्यापाऱ्यांनी एक खास साडी तयार केली आहे, जी रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पाठवली जाईल. भगवान राम आणि अयोध्या मंदिराचे छापील चित्र असलेली ही साडी माता सीतेसाठी तयार करण्यात आली आहे.
