दिघा रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

गेल्या अनेक महिन्यांपासून ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा रेल्वे स्थानक हे प्रलंबित आहे. परंतु अखेर प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे.

दिघा रेल्वे स्थानकासाठी ४२८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या स्थानकाचं बांधकाम नऊ महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं. मात्र, अजूनही या स्थानकावर ट्रेन थांबत नव्हती. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती आहे. तिथे आयटी कंपन्याही आल्या आहेत. तसेच, अनेक लोक दिघा एमआयडीसी परिसरात कामासाठी येतात. मात्र, त्यांना जवळचे असे स्थानक नव्हते. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.

अखेर दिघा गाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे दिघा परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १२ जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ चे उद्घाटन करतील. याशिवाय उरण रेल्वे मार्गाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्याचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. त्याचा विस्तार खारकोपर ते उरणपर्यंत होणार आहे.