राम मंदिरासाठी पंतप्रधान करणार 11 दिवसांचं खास अनुष्ठान; ऑडिओ संदेश केला शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवार) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. ते काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. तसेच राष्ट्रीय युवा कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. मात्र, आपल्या दौऱ्याच्या काही तास आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला उद्देशून एक आॅडिओ संदेश दिला आहे. या संदेशामध्ये त्यांनी नाशिक दौऱ्या मागचे कारण सांगितले आहे.

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त 11 दिवस बाकी आहेत. या सोहळ्यासाठी देशभरात तयारी केली जात असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान करणार आहेत. यासाठी त्यांनी एक विशेष ऑडिओ संदेश देखील जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधु संतांनी दिलेल्या सल्लानुसार 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरु करत आहे. त्याची सुरुवात नाशिकमधील पंचवटीमधून करत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संदेशामधून सांगितले. तसेच स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त त्यांना नमण करत असल्याचे आपल्या संदेशात मोदींनी म्हटले आहे. अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात होणार आहे. 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भगवान रामाची मूर्ती बालस्वरुपात साकारण्यात आली आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आणि वजन 1.5 टन आहे.

या संदेशाची सुरूवात पीएम मोदी यांनी राम-राम म्हणत केली आहे. पुढे मोदी म्हणालेत की, आयुष्यातील काही क्षण हे दैवी आशीर्वादामुळेच वास्तवात येतात. आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरात पसरलेल्या राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र प्रभू श्री रामाच्या भक्तीचं अद्भुत वातावरण पसरलं आहे.