सात वर्षांनंतर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये ३२ हजार शिक्षकांची भरती होत आहे. आतापर्यंत २६ जिल्हा परिषदांसह काही महापालिकांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. मात्र, कन्नड माध्यमांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अपूर्ण असल्याने ‘कन्नड’मधून डीएड झालेल्या भावी शिक्षकांची चिंता वाढली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांमधील पदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाकडून अंतिम करून घेतली आहे. आता आंतरजिल्हा बदलीतून येणाऱ्या शिक्षकांची संख्या गृहीत धरून सोलापूर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसांत रिक्त पदांची जाहिरात ‘पवित्र’वर अपलोड होणार आहे. पण, कन्नड माध्यमांच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची बिंदुनामावली अजूनपर्यंत अंतिम झालेली नाही. त्यामुळे आमच्या माध्यमांची शिक्षक भरती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत काही भावी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती.
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २० टक्के इंग्रजी माध्यमांचे शिक्षक घेण्याचा शासन निर्णय होता. तो रद्द झाला असून १३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार आता ज्या मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आहेत, अशाठिकाणी सहावी ते आठवीसाठी चारपैकी एक शिक्षक इंग्रजीचा असावा आणि केंद्र शाळांअंतर्गत जेवढ्या शाळा आहेत, त्याठिकाणी एक शिक्षक इंग्रजीचा (साधन व्यक्ती म्हणून) शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल वाढल्याने मराठी शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने शासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार साधारणत: एकूण रिक्तपदांपैकी २५ टक्के शिक्षक इंग्रजीचे भरती होणार आहेत. संबंधित जिल्हा परिषदांच्या मागणीनुसार ती पदे भरली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सध्या २३ जिल्हा परिषदांकडून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड केल्या असून सोलापूरसह इतर दोन जिल्हा परिषदांच्या जाहिराती १५ जानेवारीपर्यंत अपलोड होतील. त्यानंतर साधारत: २२ जानेवारीपासून नोंदणीकृत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. त्यासाठी आठ ते दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर छाननीसाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला जाणार आहे आणि फेब्रुवारीअखेर मेरिट यादी प्रसिद्ध करून शिक्षक भरतीचा शेवट होईल.
पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची आहे. खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेली जाहिरात संबंधित सक्षम प्राधिकारी तपासून पोर्टलवर मान्य करतील. खाजगी शैक्षणिक संस्थांतील जाहिरात मान्य करताना मागासवर्ग कक्षाने मंजूर केल्याप्रमाणे भरती वर्षातील आरक्षणाची रिक्त पदे नोंद केल्याची तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदे यांची नोंद करणे आवश्यक आहे.
