ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार; 14 तारखेपासून काय होतंय ते पाहा – मंत्री उदय सामंत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही आमदारांना अपत्र ठरवलं नाही. पण शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय दिला. राहुल नार्वेकरांच्या या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून टीकास्त्र सोडण्यात आले. पण एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून याचं कौतुक केलं. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मोठा दावा केलाय. उद्धव ठाकरे गटातील आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा दावा सामंतांनी केला आहे. रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला. हा निकाल लागल्यानंतर काय घडू शकणार आहे ही आतली बातमीच उदय सामंत यांनी सांगितली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत. 14 तारखेपासून काय होतंय ते पहा, असं थेट विधानच उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे कोणते आमदार शिंदे गटात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्यापासून राज्यात काय काय घडणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उदय सामंत म्हणाले, “मिलिंद देवरा यांच्या सारख्या नेत्याची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना भक्कम होईल. त्यांच्या मनात पक्षात येण्याची इच्छा असेल तर शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांच्या विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा. मिलिंद देवरा हे लोकांमध्ये जाऊन काम करणारे नेतृत्व असून त्यांच्याकडे मुरली देवरा यांचा वारसा आहे. अनेक माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतात. त्यामुळे सहकारी म्हणून देवरा यांचा चेहरा मिळाला तर शिवसेनेची ताकद फार मोठ्या पद्धतीने वाढेल.” अशी भावना उदय सामंत यांनी व्यक्त केली.

ज्या महाविकास आघाडीला पंतप्रधानांचा चेहरा नाही त्यांचा आम्ही विचार करत नाही. पहिले त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा जाहीर करावा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 10 ते 20 टक्के मतदान घेणारा चेहरा त्यांनी जाहीर करावा. हे सैरभैर झालेत कारण यांच्याकडे पंतप्रधानांचा चेहरा नाही, असे उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा आज कल्याणचा दौरा आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात कोणी गेलं तरी काही धोका नाही. कुणाला कितीवेळेस जायचं त्यांनी जावं. श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रीक केल्याशिवाय राहणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.