राज्यात हुडहुडी! उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तापमान घट

उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला असून अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व भारतात येत्या 48 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता वातावरणात पुन्हा बदल झाल्याने हवामान खात्याने राज्यात थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. शिवाय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती.

मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडहुडी पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस राज्यातील गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात कुठे पाऊस तर कुठे थंडी असे चित्र पाहायला मिळत होते. येत्या काही दिवसांत राज्यातील थंडीला सुरुवात होणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भात तापमान घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशात यंदा मान्सून कमी झाला. अनेक राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही. त्यानंतर राज्यात यंदा थंडी पडली नाही. यामुळे त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होणार आहे. परंतु आता जाता जाता थंडी पडू लागली आहे. मिनी कश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा कमी झाला आहे. लिंगमळा परिसरात गवतावर काही प्रमाणात दवबिंदू गोठले आहे. तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे महाबळेश्वरमध्ये थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही फायदा होत आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका जाणवत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी धुक्यात हरवली आहे. राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. दिल्लीतील आजचे तापमान 4 डिग्री सेल्सियस झाले आहे. थंडीमुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुके आहे. धुक्याचा परिणाम विमानसेवा आणि रेल्वे सेवेवर झाला आहे. राजधानी दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत. दिल्लीत पहाटेपासूनची 15 पेक्षा जास्त विमान उड्डाणास उशिरा झाला आहे. राजधानी दिल्लीतली दृश्यमानता पोहोचली 50 फुटांवर पोहचली आहे.

दरम्यान देशाची दक्षिण किनारपट्टी वगळता उर्वरित भागामध्ये हवामान कोरडं राहणार आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट तीव्रता वाढवताना दिसणार असून, यामुळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तर, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि बिहार या भागांवर दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार असून, इथं दृश्यमानता कमी राहील. ज्यामुळं वाहतुकीवर थेट परिणाम होणार आहेत. जम्मू काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या काही दिवसांत सातत्यानं थंडीचा कहर वाढताना दिसणार आहे.