मुंबई महानगरपालिकेची मुलुंड येथील ४६ एकर जमिन आणि मुलुंडच्या जकात नाका येथील १८ एकर जमिन धारावी पुनर्विकास प्रकल्पास हस्तांतरीत करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.शासनाने धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करून या प्रकल्पाला महत्वपूर्ण सार्वजनिक प्रकल्प असा दर्जा दिला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि.मध्ये पात्र रहिवाशांसाठी मोफत घरे तसेच सुमारे साडे तीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे बांधायची आहेत.
अपात्र रहिवाशांच्या घरांबाबत राज्याच्या गृहनिर्माण विभागाने १० जानेवारी, २०२४ रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘धारावी प्रकल्पाला विशेष सार्वजनिक प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्प उभारणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. कंपनीला पात्र रहिवाशांसाठी मोफत घरे तसेच सुमारे साडेतीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे बांधायची आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या २१ सप्टेंबर, २०२२च्या बैठकीत निविदेतील कलम १.५प्रमाणे धारावी पुनर्विकास प्रकल्प परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे बांधण्यासाठी लागणारी जमीन मिळविण्याचा प्रयत्न करेल’ असे नमूद करण्यात आले आहे. ‘जमिनीच्या भूसंपादनाचा खर्च धारावी पुनर्विकास प्रकल्पाद्वारे दिला जाईल. राज्य शासन भूसंपादनासाठी समन्वय करेल. या कराराच्या मसुद्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मुलुंड येथील ४६ एकर जमीन व पालिकेचीच मुलुंड जकात नाका येथील १८ एकर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पास हस्तांतरीत करण्यात यावी’, असे स्पष्ट निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.
आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. तब्बल ४५० एकर परिसरात पसरलेल्या या झोपडपट्टीच्या विकासाचे काम अदानी उद्योग समूहाला देण्यात आले आहे. अदानी उद्योग समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यादरम्यान ‘धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही संयुक्त उपक्रम म्हणून कंपनी स्थापन करण्यात आली आहे. धारावीकरांचे जीवनमान उंचावून, उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून देत धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा उद्देश कंपनीने या आधीच जाहीर केला आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या धारावीमध्ये नागरिकांसाठी उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली उपलब्ध करण्यात येणार आहे. सोबतच येथे सांस्कृतिक केंद्र, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्र उभारण्याची कंपनीची योजना आहे.
