अयोध्येत सोमवारी रामलल्लांची प्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्त नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने पाठविलेले छायाचित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले आहे. फडणवीस यांनी कारसेवेत सहभाग घेतला होता असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना ही थप्पडच समजली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटले आहे की नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
30 ऑक्टोंबर 1990 साली पहिली कारसेवा झाली. त्यावेळी अवघ्या 20 वर्षांचे असलेले देवेंद्र फडणवीस या कारसेवेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लाठीमार सहन केला. खांद्यावरून गोळ्या जाताना पाहिल्या. 14-15 दिवस बदायुत तुरुंगवास भोगला. दुसरी कारसेवा 5 डिसेंबर 1992 साली झाली. या कारसेवेच्यावेळी प्रत्यक्ष बाबरी ढाचा पाडण्यात आला. तो देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष अनुभवला. परतत असताना जीवावरचा धोका पत्करला. या प्रवासात अनेक ठिकाणी रेल्वे थांबत होती. थांबेल तेथे मारामाऱ्या होत होत्या.
बाबरी ही मशीद नव्हती. परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी कबुली फडणवीस यांनी अनेकदा दिलेली आहे. तसेच राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये मी कारावास भोगला. बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या 32 जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असेही ते म्हणाले होते.
