अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपणार; अयोध्येत रामराज्य परतणार

अवघा देश ज्या प्रहराची शतकानुशतके वाट पाहत होता तो मंगलमय रामप्रहर अगदी निकट आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंदिरात आज, सोमवारी सावळ्या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या मृगशिरा नक्षत्रावरील त्या देवदुर्लभ क्षणाची अनुभूती घेण्यासाठी रंगीबेरंगी फुलांनी सजलेली, लक्षावधी दिव्यांनी उजळलेली अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. रामरायाचे ध्वज जागोजागी मिरवणाऱ्या व पूर्णपणे ‘राममय’ झालेल्या अयोध्येला वेदमंत्राच्या घोषाच्या त्या नादाची आस लागली आहे. मंदिरांचे शहर असलेल्या अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांचे बहुतांश मंत्रिमंडळ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राममंदिर परिसरात चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे. अयोध्येत सध्या रामनामाचा अखंड जप सुरू आहे. कारण सर्वांच्या लाडक्या रामरायाची आज प्राणप्रतिष्ठा होणारेय. आज 12 वाजून 29 मिनिटांनी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आणि ज्या मंदिरात हा महन्मंगल सोहळा संपन्न होणार आहे. त्या नव्याकोऱ्या मंदिरालाही सजावटीचा साज बहाल झालाय. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे.

22 जानेवारी रोजी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. नक्षत्र मृगाशिरा आणि ब्रह्म योग यादिवशी आहे. त्यानंतर इंद्र योग आहे. ज्योतिषांच्या मते 22 जानेवारी ही कर्म द्वादशी आहे. ही द्वादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूने कासवाचा अवतार घेतला आणि समुद्रमंथनात मदत केली.

ज्योतिषांच्या मते 22 जानेवारीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि रवि योग असे तीन शुभ योग आहेत. कोणताही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, अभिजीत मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीरामांचा जन्म झाला.

हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठेला विशेष महत्त्व असून कोणत्याही देवतेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने त्यांचं जीनव सफल होतं असं म्हणतात. प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्राणशक्ती प्रस्थापित करणे, असं धर्म शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे मूर्तीचे अभिषेक झाल्यावर मूर्तीचे देवतेत रूपांतर होतं अशी मान्यता आहे. तर कोणत्याही मूर्तीच्या अभिषेकाचे वेगवेगळे टप्पे असून ज्यामध्ये निवासस्थान, पाणी निवास, अन्न निवास, फळ निवास, कोरडे निवास यासारख्या अधिवासांचा समावेश असतो.