माझ्याकरिता हा दिवस भावनिक दिवस; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या कार सेवेच्या आठवणी

आज अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्तानं देशभरात भक्तिभावाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार सेवेच्या आठवणींना उजाळा दिला आहे.पाचशे वर्षानंतर आजचा ऐतिहासिक दिवस आला आहे. राम मंदिर तोडताना त्यांच्या मनात विचार होता की भारतीय राम कृष्ण यांना विसरले नाहीत तर त्यांना गुलाम करता येणार नाही. संघर्ष झाला, लढाई झाली, स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषदेने संघर्ष केला. राजकीय स्वातंत्र्य मिळालं पण आध्यात्मिक स्वतंत्र आवश्यक होतं.

राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्‍या निमित्‍त ‘विश्‍वविक्रमी’ शेफ विष्‍णू मनोहर आज (२२ जानेवारी) जगदंबा संस्‍थान कोराडी येथे 6 हजार क‍िलोचा महाप्रसाद तर अयोध्‍येत 26 जानेवारीनंतर 7 हजार क‍िलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करून दोन नवे जागत‍िक विक्रम प्रस्‍थापित करणार आहेत. यासाठी जगातील सर्वात मोठी ‘हनुमान’ कढई तयार करण्‍यात आली आहे. विशेष म्हणजे ही कढई विष्‍णू मनोहर अयोध्‍येतील श्रीराम मंदिराला अर्पण करणार आहेत. हलवा बनवायला सुरुवात करण्यात आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी भेट देऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्याकरिता हा दिवस भावनिक दिवस आहे. कारण, ज्या क्षणासाठी वयाच्या विसाव्या वर्षापासून संघर्ष केला. ज्या क्षणाकरिता गोळ्या, लाठ्या झेलून जेलमध्ये गेलो तो क्षण याची देही याची डोळा याला मिळणं हे म्हणजे रामाचा आशीर्वादच आहे असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कारसेवक म्हणून आमचा नारा होता रामलल्ला आयेंगे मंदिर वही बनायेंगे, 6 डिसेंबर 1992 ला ढाचा खाली आला आणि तेथे राम मंदिर उभं राहत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारलं आणि त्यांच्याच हस्ते आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. शेकडो कोटी हिंदूसाठी हा दिवस अविस्मरणीय आणि ऐतिहासिक आहे. भारताची नवीन अस्मिता आजपासून सुरू होत आहे अशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविल्या. यावेळी मात्र त्यांनी कुठलेच राजकीय भाष्यं केलं नाही हे विशेष.