राज्यभरात श्रीराम नामाचा गजर; चंद्रपूरमध्ये 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

आज (22 जानेवारी )आयोध्या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यातही राममय वातावरण तयार झाले आहे.

यातच अयोध्या नगरीत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच मुंबईत ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्या माध्यमातून भव्य असे 50 फुटी राम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने कलश यात्रा, होम हवन आणि रामलीला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी या मंदिराच्या प्रतिकृतीला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राम भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे.

नगर जिल्ह्यातही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा उत्साह दिसून येतो आहे. नगरमधील हा सोहळा विश्वविक्रमी होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणून अर्पिले जाणार आहेत. भाजपसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, धार्मिक संघटना आणि संस्थांच्या वतीने जिल्ह्यातील राम मंदिर तसेच हनुमान आदी देवी-देवतांची मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. मंदिर परिसरात भगव्या पताका, सडा-रांगोळ्यानी सजवली जाणार आहेत. अनेकांनी महाआरती, महाप्रसाद, भजन-कीर्तन यांचे आयोजन तर राम-सीता वेशभूषा, रांगोळी स्पर्धा असे विधिवत कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. घराघरात दिवे-पणत्या, आकाश कंदील, रांगोळी, गोडधोड जेवण करून दिवळीसारखा हा दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

चंद्रपूरमधील मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

दीपोत्सवाचे जगभरातील लाखो रामभक्त साक्षीदार ठरले. पहिली रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान वाल्मिकी समाजाच्या शशी लखन, दुसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान केवट भोई समाजाच्या आशा दाते, तिसरी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान मुस्लिम समाजाच्या चांद पाशा सय्यद, चौथी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान अनुसूचित जातीच्या प्रियंका थुल, पाचवी ज्योत प्रज्वलित करण्याचा मान आदिवासी समाजाच्या गीता गेडाम तर सहावी रामज्योत प्रज्वलित करण्याचा मान शीख समाजाच्या वतीने बलजीत कौर बसरा यांना मिळाला. तसेच सौ. सपना मुनगंटीवार, शलाका बिडवई यांनीही ज्योत पेटवली. त्यानंतर राम सेविकांमार्फत संपूर्ण ज्योती पेटविण्यात आल्या.