इंडिया आघाडीला मोठा धक्का; ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये ‘एकला चलो रे’चा नारा

इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या कळपातून पहिला पक्ष बाहेर निघालाय. तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला झटका दिला आहे. त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. काँग्रेसने टीएमसी चा प्रस्ताव मानला नाही, म्हणून हा निर्णय घेतला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. टीएमसी आणि काँग्रेसमध्ये मागच्या काही दिवसांपासून जागावाटपावरुन वादविवाद सुरु होते. ज्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही, त्यावेळी टीएमसीने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीची पहिली विकेट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत.

ममता बॅनर्जींनी ही घोषणा केली तेव्हा त्यांच्या बोलण्यातून उपेक्षेची वेदना आणि कटुताही दिसून आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी ज्या काही सूचना दिल्या, त्या सर्व फेटाळण्यात आल्या. एवढं झाल्यावर आम्ही एकट्याने बंगालला जायचं ठरवलं आहे. राहुल गांधींचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत, याविषयीची माहितीही त्यांना दिली गेली नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या सगळ्याबाबत आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केलीय. भाजप नेते गौरव भाटिया यांनी टीका करताना म्हटलं की, गई भैस पानी में, घमंडी या झंडिया? असं म्हणत इंडिया आघाडीवर त्यांनी निशाणा साधला. भाजप नेते गिरीराज सिंह यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींना हरवण्यासाठी हे लोक एकत्र आले होते. पण अहंकारी आघाडीत सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे. काँग्रेस नेते प्रमोद कृष्ण यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, यांचा निशाणा भाजप नाही तर काँग्रेस आहे. आघाडीतील नेत्यांचे मन एक नाहीय.

लोकसभा निवडणुकीसाठी 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपविरोधात एकजूट केली होती. विरोधी पक्षांनी इंडिया अलायन्सची स्थापना केली होती. विरोधकांनी एकजूट करून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव करून त्यांना निवडणुकीत आव्हान देण्याची योजना आखली होती, मात्र आता बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी घेतलेल्या ‘एकला चलो रे’च्या भूमिकेमुळे विरोधकांच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे.