आगामी लोकसभा अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सभा, रॅली, मोर्चा यांना ऊत आला आहे. निवडणूक आयोगानेही लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मोहिम राबवली जाणार आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधे देखील मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होते. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पुण्यातील मतदारांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यात एक लाख 75 हजार मतदारांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर करण्यात आली. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला आणि तरुण मतदारांची संख्या वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या 97 हजार 350 पेक्षा अधिक आहे. 18-19 वयोगटातील 45 हजार आणि 20-29 गटातील 65 हजार 984 नवमतदारांची वाढ झाली आहे.
शहरी मतदारांमधे मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हा निर्णय घेतल्याच सांगण्यात आलंय. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील सोसायटीतील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जावे लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सुचना निवडणूक आयोगाने दिल्यात.
