पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी मुस्लिम अनुनयाचे राजकारण करतात यात नवीन नाही. मात्र, एका सर्वधर्मसमभाव सभेत ममता बॅनर्जींनी हिंदूंना थेट काफीर म्हटले असून अल्लाह कसम त्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांना मुंबईत पायघड्या घालणारे शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यावर काय भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर चिडलेल्य ममतांनी कोलकत्ता येथे मशीद तसेच चर्चला भेट दिली. त्यानंतर सर्वधर्म मोर्चा काढला. यामध्ये बोलताना त्या म्हणाल्या, अल्लाह कसम, भाजपला मदत करणाऱ्या काफीरांना मी सोडणार नाही. त्या म्हणाल्या, एक गोष्ट लक्षात ठेवा. भाजपची मदत करू नका. तुमच्यापैकी कोणीही भाजपची मदत केली तर अल्लाह कसम मी त्याला माफ करणार नाही. काफिर हैं वो डरते हैं, जो लड़ते हैं वो जीतते हैं। राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेन्दु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या भाषणाची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतर ममता बॅनर्जी सातत्याने मुस्लिम समाजाला भडकावत आहेत. इस्लाम मानत नसलेल्यांना काफीर असे म्हटले जाते. त्यामुळे काफीर या शब्दाचा वापर करून ममता बॅनर्जी काय सांगू पाहत आहेत, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
हिंदूत्वनिष्ठ असलेले शिवसेनेच्या उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे आता यावर काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली होती. त्यावेळीही उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठली होती. स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणवून घेणारे पक्षप्रमुख त्याच ममता बॅनर्जींची भेट घेणार ज्यांनी प. बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशींसाठी पायघड्या घातल्या आणि अवैध घुसखोरीला उघडपणे समर्थन दिले, अशी टीका झाली होती. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उध्दव ठाकरे हिंदूंना काफीर म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा निषेध करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये घ्यावे यासाठी उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार प्रयत्नशील होते. मात्र, ममतांनी आजच ‘एकला चलो रे’चा नारा देत आपण पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळेही उध्दव ठाकरे यांची पंचायत झाली आहे.
