महाविकास आघाडीला पुरतं बदनाम करून सोडायचं असा चंग वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बांधला आहे. एक तर आंबेडकरांना राजकीय भविष्य सांगण्याची आवड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारा संभाव्य बॉम्बस्फोट त्यांनी अगोदरच सांगितलं होता. देशपातळीवर झालेली इंडिया आघाडी टीकणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. काल सोलापूरच्या सभेत बोलताना आंबेडकर यांनी महाराष्ट्रात तरी इंडिया किंवा महाविकास आघाडी टिकेल का असा संशय व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या मनात संशय असला तरी ते महाविकास आघाडीने आपल्याला सोबत घ्यावे यासाठी निमंत्रणाची वाट पाहत आहेत. त्यांच्या अटींवर युती होणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मग ते सातत्याने आघाडीत घ्यावे अशा विनवण्या का करत आहेत. याचे कारण म्हणजे आघाडीत घेतले नाही तर काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंचे खायचे दात आणि दाखवायचे दात यात काय फरक आहे हे त्यांना सांगायचे आहे. अपमानास्पद वागणूक मिळाली, विषाचा प्याला प्यावा लागला तरी भाजपला हरविण्यास आपण तुमच्या सोबत येण्यास तयार आहोत असे त्यांना दाखवून द्यायचे आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढवावी लागल्या तर त्यासाठी पार्श्वभूमी ते तयार करत आहेत.
रमेश चेन्नीथला, राहुल गांधी, सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खर्गे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ असे सांगत महाविकास आघाडीच्या बैठकीत एकप्रकारे सहभागी होणार नसल्याचे अप्रत्यक्ष स्पष्ट केले होते. नाना पटोले यांची पत्र लिहून चांगलीच खरडपट्टी काढली होती. असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे, अशी जहरी टीका केली होती.युतीमध्ये सन्मानाने सोबत घ्यायचे नाही आणि स्वतंत्रपणे लढल्यास भाजपची बी टीम असल्याचा आरोप करायचा ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची जुनी खोड आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकात वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपला झाला असंही आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी’ टीम असल्याची टीका केली होती. पण तुम्ही सोबत घेणार नाही आणि आपला पक्ष टिकून ठेवण्यासाठी कोणी निवडणूक लढविली तर त्यांच्यावर आरोप करायचे ही दूटप्पी नीती प्रकाश आंबेडकर उघड करत आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार उमेदवारांना ४१,३२,२४२ म्हणजे ७.६४% एवढी मते मिळाली होती. राज्यात एवढी ताकद असतानाही प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यायचे नाही असा काही नेत्यांचा डाव असल्यानेच त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असावी असे आता त्यांच्या कार्यकर्त्यांनाच वाटू लागले आहे.
