बिहारमध्ये भाजपला सापडला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा!

बिहारमध्ये सुरू असलेल्या सत्ता समीकरणात भाजपने आपला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा सम्राट चौधरी यांच्या रूपाने जनतेसमोर ठेवला आहे. आज जेव्हा सम्राट चौधरी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते तेव्हा उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता आणि लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीची लढत सम्राट चौधरी विरुद्ध तेजस्वी यादव यांच्यात होईल अशी शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. सम्राट चौधरी हे मागास जातीतील असून आता ते बिहारमध्ये भाजपचे अधिकृत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

५३ वर्षांचे सम्राट चौधरी हे शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. शकुनी चौधरी हे समता पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. तसेच ते अनेकवेळा आमदार-खासदार राहिले आहेत. त्यांचे नाव कुशवाह समाजाच्या बड्या नेत्यांमध्ये घेतलं जातं. सम्राट चौधरी यांनी आपली राजकीय कारकीर्द १९९० मध्ये आरजेडीसोबत केली होती. १९९९ मध्ये राबडी देवी सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. पण, त्यांच्या कमी वयामुळे वाद निर्माण झाला होता.

सम्राट चौधरी २००० आणि २०१० मध्ये परबत्ता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. २०१४ मध्ये ते नगर विकास मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांनी आरजेडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. ते एनडीएमध्ये पंचायती राज मंत्री होते.भाजपने नितीश कुमार यांची भविष्यातील पलटी मारण्याची दारे बंद केलेली आहेत. भाजप सुध्दा आता प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने उचलत आहे आणि २ उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्षपद ही स्वतःकडे ठेवून घेतले आहे.