भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. ही निवडणूक २७ फेब्रुवारीला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. त्यामुळे आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीआधीच राज्यसभेचा धुरळा उडणार आहे.
१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य, एक कायमस्वरूपी संस्था, दर दोन वर्षांनी निवृत्त होतात, त्यामुळे सदनाच्या कामकाजात सातत्य राखले जाते.संसदेच्या वरच्या सभागृहाचे सदस्य, राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे निवडले जातात. ते एकल हस्तांतरणीय मताद्वारे प्रमाणित प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे निवडले जातात.
सर्वाधिक रिक्त जागा उत्तर प्रदेशातील (१०) आहेत. याशिवाय बिहार आणि महाराष्ट्रातील ६-६ जागाही रिक्त होत असून, त्यावर निवडणुका होणार आहेत. तसेच पश्चिम बंगाल (५), मध्य प्रदेश ५), गुजरात (४), कर्नाटक (४), आंध्र प्रदेश (३), तेलंगणा (३), राजस्थान (३), ओडिशा (३), छत्तीसगड (१), हिमाचल प्रदेश (१), हरियाणा (१) आणि उत्तराखंड (१) च्या रिक्त जागांवरही त्याच दिवशी मतदान होणार आहे.
