पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला आणखी एक अभिमानास्पद भेट दिली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा यामध्ये समावेश आहे. मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तींचे हे किल्ले प्रतीक आहेत.
महाराष्ट्रात 390 पेक्षा जास्त किल्ले आहेत त्यापैकी 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत निवडले आहेत, यापैकी आठ किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत. शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी किल्ला यांचा त्यात समावेश होतो . साल्हेर किल्ला, राजगड, खांदेरी किल्ला आणि प्रतापगड हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने संरक्षित केले आहेत.
सांस्कृतिक आणि नैसर्गिक निकष अशा नामांकनाच्या दोन श्रेणी आहेत- गड किल्लेसांस्कृतिक निकषांच्या श्रेणीमध्ये नामांकित आहेत. जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक स्थळांसाठी सहा निकष आणि नैसर्गिक स्थळांसाठी चार निकष आहेत. सांस्कृतिक परंपरेची किंवा जिवंत किंवा नाहीशी झालेल्या सभ्यतेचे अद्वितीय प्रतीक, वास्तुशिल्प किंवा तंत्रज्ञान जे मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असेल.
भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे आहेत, सात नैसर्गिक स्थळे आहेत तर एक मिश्र स्थळ आहे. महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, पाच सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक या आहेत. यामध्ये अजिंठा लेणी , वेरूळ लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस), व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई (2018) आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट हे नैसर्गिक श्रेणी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमहाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अनेकानेक आभार ! ॥ जय जिजाऊ , जय शिवराय ॥ असे त्यांनी म्हटले आहे.
