ईडी कडून सध्या देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींची चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे ईडीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. महाराष्ट्रात अनेक नेत्यांची चौकशी सुरु आहे. ईडी चौकशी झारखंडमधील मुख्यमंत्र्यांपर्यंत आली आहे. ईडीकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची भीती असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. ईडीने त्यांची कार जप्त केली आहे. तसेच सोरेन त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नसल्यामुळे विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
हेमंत सोरेन कुटुंबाच्या एका सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘पीटीआय’ला सांगितले की, ईडी आणि सोरेन यांच्यादरम्यान अनेकदा संभाषण झाले आहे. त्यानुसार, त्यांनी ३१ जानेवारीला रांची येथील निवासस्थानी दुपारी एक वाजता जबाब नोंदवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी ईडीने २० जानेवारीला रांची येथील निवासस्थानी सोरेन यांची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांना २९ जानेवारी किंवा ३१ जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
ईडीची टीम दिल्ली पोलिसांसह सोमवारी (29 जानेवारी, 2024) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी पोहोचली होती. मात्र ते त्यांच्या निवासस्थानात नव्हते. तब्बल तेरा तास ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या घरी तळ ठोकला होता, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री सोरेन हे अटकेच्या भितीने फरार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) ईडीची कारवाई हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा नियोजित कट असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन शनिवारी संध्याकाळी दिल्लीला गेले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे रविवारी सकाळी दिल्लीत आल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचाली वाढल्या. दरम्यान, ईडीच्या पथकाने सोमवारी दिल्ली येथील सोरेन यांच्या घरावर छापा टाकत त्यांची कार आणि काही कागदपत्रे जप्त केली. दिल्ली आणि रांची येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जेएमएमच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाजवळ ईडीच्या विरोधात निदर्शने केली. राजभवन, सीएम हाऊस, भाजप कार्यालय, ईडी कार्यालयासह रांचीमधील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आले.
