राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी संसदेत अभिभाषण केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नव्या संसद भवन इमारतीमधील त्यांचे हे पहिलेच भाषण असल्याचे सांगितले. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले. भारतीय संविधान लागू होऊन 75 वर्ष झाले आहेत. मागच्या वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला. जी – 20 शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका आणखी सशक्त झाली आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रमुख मुद्दे-
- संविधानाच्या अंमलबजावणीच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त देशाने स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी अमृत महोत्सव साजरा करून देशाच्या तरुण पिढीने पुन्हा स्वातंत्र्याचा काळ जगला. राष्ट्राने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला.
- देशाच्या कानाकोपऱ्यातून हुतात्म्यांच्या गावातून दिल्लीत आणलेल्या मातीचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाल्या की, अमृत कलश दिल्लीत आणणे हा ऐतिहासिक क्षण होता. त्यासाठी सरकारने मेरी माटी मेरा देश अभियान सुरू केले, ते कौतुकास्पद आहे.
- जगातील गंभीर संकटावर मात करत भारतात सर्वात वेगाने विकसीत होणारी अर्थव्यवस्था बनली. सलग दोन तिमाहीत विकास दर 7.5 टक्क्यांहून अधिक आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर तिरंगा फडकावला आहे. असं करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.
- राम मंदिर उभारण्याची इच्छा कित्येत दशकांपासून होती. आज ती पूर्ण झाली आहे. जम्मू-काश्मीर ते आर्टिकल 370 हटवण्यासंदर्भात काही शंका होत्या. आज मात्र ते ऐतिहासिक निर्णय बनले आहेत. याच संसदेत तीन तलाकविरोधात कायदा करण्यात आला.
- आमच्या सरकारने लाखो युवकांना नोकऱ्या दिल्या आहेत. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभेत आरक्षण मिळाले
- सरकार डिजीटल इंडियासाठी झटत आहे. आज जगातील एकूण रियल टाइम डिजीटल देवाण-घेवाणीत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात युपीआयने 1200 कोटींचे ट्रान्सेक्शन झाले.
- डिजीटल इंडियासोबतच फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही गुंतवणुक मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या दहा वर्षात गावाता चार लाख किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची लांबी 90 हजार किलोमीटने वाढून आता 46 लाख किलोमीटर झाली आहे.
- ‘वन रँक वन पेन्शन’ लागू केली, ज्याची चार दशकांपासून प्रतीक्षा होती. ओओपी च्या अंमलबजावणीनंतर माजी सैनिकांना अंदाजे 1 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्यांदाच भारतीय लष्करात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे.
- आम्ही भारताला नाजूक पाचमधून बाहेर पडताना आणि पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनताना पाहिले आहे. भारताची निर्यात सुमारे 450 अब्ज वरून 775 बिलियन पेक्षा जास्त झाली आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीत चौपटीने वाढ झाली आहे.
- परीक्षेतील गैरप्रकारांबद्दल तरुणांच्या चिंतेची जाणीव आहे. ते थांबवण्यासाठी कायदा करणार आहे.
नव्या संसद भवन इमारतीमधील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हे पहिले भाषण होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी याबाबत आठवण करून दिली. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याआधी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलचे अनुष्ठान केले गेले.
