आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत तसेच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवुन या कामाला प्राधान्य द्यावे. आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी यंत्रणा तयार करुन ही मोहीम मे महिन्यापासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री जन मन योजनेच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, माजी आमदार विवेक पंडित, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनूपकुमार यादव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजना प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी नाशिक, पालघर, रायगड, आदिवासी विकास आयुक्त व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री जन मन योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. आदिवासींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देता यावा यासाठी आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत. ही मूलभूत कागदपत्र वितरणासाठी एक यंत्रणा तयार करावी. या कामाचा समन्वय विभागीय आयुक्त करतील तर ग्रामविकास विभाग प्रमुख विभाग राहील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी अधिकारी यांना नोडल अधिकारी करून, मूलभूत कागदपत्रे संदर्भात चेक लिस्ट करावी आणि त्याप्रमाणे जी कागदपत्रे आदिवासी नागरिकांकडे नाहीत ती त्यांना देण्यात यावीत. हे काम प्राधान्याने करावे. ठाणे, रायगड, नाशिक आणि पालघर जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष घालावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील वेठबिगारीची समस्या सोडविण्यासाठी आदिवासींना देण्यात येणाऱ्या सहकार्य संदर्भात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यासंदर्भात यामध्ये प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती मदतीसाठी न्युक्लिअर बजेटमधून पैसे द्यावेत, वनपट्ट्टांचे प्रश्न, शेळी पालन योजना या देखील प्रभावीपणे आदिवासींसाठी राबवण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
