आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी आणि सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.
बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर -आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.
राज्य मंत्रिमंडळाकडे चर्चेत असलेले अनेक प्रश्न आणि समस्या यांच्यावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध नव्या योजनांवर संवाद साधण्यासाठी दर आठवड्याच्या बुधवारी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित असतात. मात्र आज सकाळीच अनिल बाबर यांच्या निधनाची बातमी येऊन धडकली. त्यानंतर शिंदे गटाचे वातावरण शोकाकूल झाले. तसेच, आपले सहकारी असलेल्या आमदाराच्या अंत्यदर्शाला सांगलीला जाण्याचेही मुख्यमंत्र्यांनी ठरवले. त्यामुळे आजची कॅबिनेट बैठक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी कल्जेराव बाबर यांच्या कुटुंबात अनिल बाबर यांचा जन्म झाला. अनिल बाबर यांनी त्याच्या राजकीय कारकिर्दीत टेंभू योजनेसाठी संघर्ष केला. त्यांना टेभू योजनेचे जनक म्हणून देखील ओळखलं जातं
