विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा

गेले काही दिवस महाराष्ट्रासह देशात हवामानातील बदल पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत असून विदर्भात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर वेधशाळेने ही माहिती दिली असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

नागपूरसह परिसरात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. नागपूरला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक भागांत थंडीत अचानक वाढ झाली आहे. तसेच पारा सरीसरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र पुढील पाच ते सात दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या एक दोन जिल्ह्यांमध्ये अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर दिवशी मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ७२ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटा सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज हिंगोली व नांदेड याबाबत मेघगर्जना व विजांच्या कडकडे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.अचानक थंडीमध्ये वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फुगवणीला आलेल्या व काढणी चालू असलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असली तरी मराठवाड्यापासून विदर्भ, छत्तीसगड ते आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत खंडीत वाऱ्यांची स्थिती विरली आहे. छत्तीसगडपासून विदर्भ, कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे.