खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आली आहे. त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार ही धमकी पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान येथून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात या विषयी माहिती देत तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवनीत राणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून 088055 41949 संपर्क क्रमांकावरून कोणीतरी विठ्ठल राव नामक व्यक्तीचा मला कॉल येत होता. या व्यक्तीने तिवसामधून मी बोलतो आहे असं सांगितलं. तो मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे. तु गर्दीच्या ठिकाणी जाते ना त्या ठिकाणी मी कधीही धारधर चाकुने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही. तसेच फोनवर अश्लील शिवीगाळ करुन खालच्या भाषेचा वापर केला, असंही नवनीत राणांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

दुपारी 2 वाजून 9 मिनिटांनी ही ऑडिओ क्लीप नवनीत राणा यांना आली होती. त्यानंतर 2 वाजून 13 मिनिटाने याच नंबरवरुन व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला, जो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ऑडिओ क्लीप आली.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं देखील नाव या ऑडिओ क्लीपमध्ये घेण्यात आलं आहे. अफगाणिस्तानने अमेरिकेची जशी वाट लावली तशीच भारताचीही आम्ही वाट लावू शकतो. आम्ही ठरवलं तर क्षणात काहीही करु शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी ओवीसी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभेमध्ये खासदार ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनेकदा ओवैसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी ओवैसी यांची चौकशी केल्यावर त्यांची आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल.