शरद पवारांचं नाव, फोटो वापरु नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

केंद्रिय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा करत फोटो आणि घड्याळ चिन्ह वापरण्यावर आक्षेप नोंदवला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश दिले आहेत.

निवडणूक प्रचारात शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरता, असा प्रश्न न्यायालयाकडून अजित पवार गटाला विचारण्यात आला. ‘तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलात. मग आता त्यांचा फोटो का वापरता? आता स्वत:ची ओळख निर्माण करा आणि त्याच्या आधारे निवडणूक लढा,’ अशा सूचना न्यायालयानं अजित पवार गटाला केल्या आहेत.

आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही त्यांचे नाव, फोटो इ. वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती कांत यांनी सिंग यांना सांगितले. सिंग यांनी याबाबत हमीपत्र दाखल करण्याचे मान्य केले. गेल्या महिन्यात या याचिकेवर नोटीस बजावताना न्यायालयाने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी देऊन तात्पुरता दिलासा दिला होता. यापूर्वी, निवडणूक आयोगाने त्यांना 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या राज्यसभा निवडणुकीपर्यंत हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती.

ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे? असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 18 मार्च रोजी होणार आहे.