खडसेंचे घरही शरद पवार फोडणार; नणंद भावजयीत भांडणे लावणार

भारतीय जनता पक्षाने रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्या नणंद रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन खडसेंचे घर फोडण्याचाही डाव शरद पवार खेळणार आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळेल की नाही अशी शंका होती. मात्र, पक्षानी त्यांच्या एकनिष्ठतेची दखल घेऊन त्यांनाच उमेदवारी मिळाली. त्या अनुषंगाने शरद पवार, एकनाथ खडसेआणि रोहिणी खडसे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. रावेर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्या अनुषंगाने भाजपाने एकनाथ खडसेंच्या सुनेला म्हणजेच रक्षा खडसेंना तिकिट दिलं आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून म्हणजेच रक्षा खडसे भाजपात आहेत. रक्षा खडसे २०१९ लाही चांगल्या मतांनी निवडून आल्या होत्या. आता त्यांच्याविरोधात कुठला उमेदवार द्यायचा? त्याचा प्रचार एकनाथ खडसे करणार का? असा प्रश्न होता. परंतु, जर रोहिणी खडसेच उभ्या राहिल्या तर एकनाथ खडसे मुलीसाठी प्रचार करणारच याची पवारांना खात्री आहे.

या मतदारसंघावर लेवा पाटील समाजाचा पगडा आहे. त्याआधारेच खासदार खडसे यांना सहा लाखांहून अधिक मते मिळाली. त्या भाजपच्या उमेदवार म्हणून 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्या आहेत. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचा लेवा पाटील समाजाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांत समावेश आहे. खासदार रक्षा खडसे यांनी 2010 मध्ये भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांनी खासदार म्हणून ग्रामपंचायत स्तरापर्यंत आपला संपर्क वाढविला आहे. त्याचा राजकीय लाभ त्यांना झाला आहे.
रक्षा खडसे यांचा जीवनपट म्‍हणजे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा आहे. एका सामान्‍य 26 वर्षीय गृहिणीचं जीवन अचानक बदलून गेलं, त्‍यांचे पती निखिल खडसे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली.

रक्षा खडसे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला होता. रक्षा खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत एकप्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता.

रोहिणी खडसे एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतले आहे. 2019 मध्ये भाजपने एकनाथ खडसे यांची उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी यांना तिकीट दिले. मात्र, त्या निवडणुकीत अल्पशा फरकाने पराभूत झाल्या. यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केल्यावर रोहिणी खडसे यांनीही पक्षात प्रवेश केला.