लोकसभा निवडणुकीत तब्बल २ लाख मतदार हे १०० वर्ष वयाचे , निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज जाहीर करण्यात आल्या आहेत. अखेर देशात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर केल्यात. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार असल्याचे सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त्त राजीव कुमार यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राजीव कुमार म्हणाले, देशभरात एकूण ९७ कोटी मतदार हे नोंदीकृत आहेत. देशभरामध्ये साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम, १.२ कोटी प्रथम मतदार, ४८ हजार तृतीयपंथी, १०० वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या २ लाख ,१. ५ कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्यानंतर विशेष सोयी केल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावर शौचालय, व्हिलचेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा दिल्या जाणार आहेत.

या निवडणुकीत बळ पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही. काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. यावर या निवडणुकीत पूर्ण नियंत्रण केल जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. तसंच २६ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.